Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) कारवाईबाबत आघाडीवर असून, गेल्या फेब्रुवारी महिन्यात एलसीबीच्या पथकाने अवैध व्यावसायिकांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे.
मोहिमेअंतर्गत १२६ अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकूण १४३ आरोपींकडून ७ लाख ४० हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. खून, खुनी हल्ला, दरोडा, दरोड्याची तयारी, हाणामारी अशा अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील आरोपींना एलसीबीने गजाआड केले आहे.
एकंदरितच एलसीबी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत असून, एलसीबीच्या पथकाने आता आपला मोर्चा अवैध व्यावसायिकांविरुद्धही वळविला आहे. खास मोहीम आखून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. सुमारे ८६ ठिकाणी छापे टाकून अवैध दारु विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.
देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टी व कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे. ८६ ठिकाणी छापे टाकून ५ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जुगार, मटका, बिंगो चालविणाऱ्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
तब्बल २० ठिकाणी कारवाई करून २ लाख लाख १५ हजार ५२० रुपयांची रोकड, जुगाराची साधने जप्त करून ५६ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम यापुढेही अशीच प्रभावीपणे चालू राहील, अशी माहिती एलसीबीच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांच्या टिमने ही धडक कारवाई केली.