पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील असा टोला महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी असल्याने नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि अहिल्यानगरचा खासदारही महायुतीचा असेल असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला.
तालूक्यातील भाळवणी येथे महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, काशिनाथ दाते, प्रा. विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात खा. डॉ. विखे म्हणाले की, या निवडणुकीत निम्मे काम जेष्ठ नेत्यांनी करून टाकले आहे. आता उरलेले निम्मे काम १३ मे रोजी मतदार संघातील जनता करेल. शरद पवारांच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागला. हा उमेदवार कसा आहे? हे पारनेरच्या जनतेला चांगले माहित आहे. पण पारनेरच्या जनतेला २०१९ मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. या मतदार संघातील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा मतदारांपुढे आहे. जे केले तेच आपण सांगतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची पार्श्वभूमी मांडून केवळ गुंडगीरी आणि दहशत निर्माण करण्याचे तंत्र तालुक्यात अवलंबवले गेले. पण आता सर्वच गोष्टींची पोलखोल झाली आहे. तालुक्यात घडलेल्या अनेक गोष्टीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर यांनी विकासाच्या मुद्यावर अजितदादा पवार यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. अहिल्यानगरचा विकास करण्यासाठी महायुतीचा खासदार निवडून जाणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.