आ.पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला. मात्र या ५० वर्षात त्यांनी काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होते.
नव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन मतदान होणार नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे.
हे देखील लक्षात घेतले पाहिजे. अशी टीका (शिवसेना )उद्धव बा. ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर केली आहे. आ.बबनराव पाचपुते यांनी शैक्षणिक, सामाजिक,
राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीतून केलेल्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या माध्यमातून आ.पाचपुते यांनी आगामी राजकीय वाटचालीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
एकीकडे यावरून तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांनी आमदार पाचपुते यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे पाचपुते यांच्या शक्तिप्रदर्शनाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सन १९८० मध्ये विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेलेल्या आ. पाचपुते यांनी नऊ वेळा विधानसभा निवडणुकांपैकी सात वेळा विजय मिळवत आमदार म्हणून काम केले. सात वेळा आमदार व त्यातील तब्बल तेरा वर्षे मंत्रीपदावर काम केले आहे.
मात्र प्रत्येक वेळी वेगळे निवडणूक चिन्ह घेवून विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले आमदार पाचपुते यांनी आगामी राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यासाठी नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा काष्टीत आयोजित केला होता.
या मेळाव्यास खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब शेलार यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.