खा.लोखंडेंची नेमकी काय आहे गोदावरी खोऱ्यातील पाणी पूर्वेकडे वळवण्याची संकल्पना ? शेतकऱ्यांना कसा होईल फायदा? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर, नाशिकसह मराठवाड्यातील जिल्हे अनेकदा दुष्काळग्रस्त असतात. पाणलोटक्षेत्रात पाऊस झाला तर धरणे भरतात परंतु तरीही उन्हाळाच्या शेवटच्या आवर्तनाला अडचण ही ठरलेलीच असते.

त्यात जर मराठवाड्यात पाऊस कमी झाला तर जायकवाडीला पाणी सोडण्याचे अर्थात समन्यायी पाणी वाटपाचे संकट ठरलेलेच. त्यामुळे यावर एक चांगला उपाय शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडला. पश्चिमेकडे वाहणारे पाणी पूर्वेकडे वळवावे असे त्यांनी सुचवले.

 काय म्हणाले खा.लोखंडे :-खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले की, गोदावरी खोऱ्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील घाटांवरून पश्चिमेकडे वाहणारे पाणी पूर्वेकडे वळवले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांना या पाण्याचा मोठा फायदा होईल.

दुष्काळ हटून राष्ट्रीय संपत्तीत वाढ होईल असे ते म्हणाले. गोदावरी खोऱ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उगम पावणाऱ्या गोदावरी, मुळा, प्रवरा, म्हाळुंगी आणि आढळा या प्रमुख नद्यांचा समावेश आहे. यामध्ये गंगापूर, गोदावरी नदीवर उर्ध्व गोदावरी, प्रवरा नदीवर भंडारदरा व निळवंडे, पिंपळगाव खांड, मुळा नदीवर मुळा धरण अशी मोठी धरणे बांधण्यात आली आहेत.

या तिन्ही नद्यांच्या संगमानंतर पैठणमध्ये जायकवाडी धरण बांधण्यात आले. हा प्रदेश महाराष्ट्राचा पर्जन्यछायेचा प्रदेशअसल्याने या भागात पाऊस फार कमी पडतो. दरवर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पश्चिमेकडे वाहणारे पाणी पूर्वकडे वळवल्यास नगर नाशिकसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटू शकेल, असे लोखंडे यांनी सांगितले. त्यात सामान्यायीची टांगती तालावर असतेच. आधीच वरच्या भागातील दारणा, गंगापूर, मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या भागातील शेती नियोजन बऱ्याचदा कोलमडते त्यात जर पाणी सोडले तर मग ही स्थिती आणखीनच खराब होते. त्यामुळे पाणी वळवणे हा चांगला पर्याय आहे.

 कसे करावे लागेल नियोजन?:- सह्याद्री पर्वत रांगेतील घाटातून पाणी लहान ओढ्यांमधून पूर्वेकडे वाहण्याऐवजी पर्वतांच्या भौगोलिक रचनेनुसार उलट म्हणजेच पश्चिमेकडे वाहते. त्यासाठी काही ठिकाणी लहान पाण्याच्या ओढ्यांवर मातीचे छोटे बंधारे बांधून पाणी पूर्वेकडे वळवणे सोयीचे होईल. याचा फायदा असा होईल की, या कामासाठी व्यापक भूसंपादनाची गरज लागणार नाही. त्याचप्रमाणे हा छोटा प्रकल्प असल्याने मोठ्या भांडवली खर्चाची गरज भासणार नाही असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe