Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळ छायेखाली असलेल्या तळेगाव भागातील देवकौठे गावच्या शिवारापर्यंत नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचले आहे. त्यामुळे लाभधारक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
तळेगाव भागातील शेतकऱ्यांनी अनेक वर्ष निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा केली. माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून देवकौठे गावच्या शिवारापर्यंत निळवंडे धरणाचे पाणी पोहोचले, अशी प्रतिक्रिया उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे यांनी व्यक्त केली.
तर आमदार बाळासाहेब थोरात हे निळवंडेचे पाणी दुष्काळी भागासाठी आणणारे जलदूत ठरले, अशी प्रतिक्रिया देवकौठे सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र कहांडळ यांनी व्यक्त केली.
निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांमधून शिवारापर्यंत पोहोचल्याने व बंधारे भरल्याने दुष्काळपिडीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या पाण्यामुळे दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे.
देवकौठे शिवारातील बंधारे भरून निळवंडेचे पाणी सिन्नर तालुक्यातील मलढोण व सायाळे गावापर्यंत जाणार आहे, असे राजेंद्र कहांडळ यांनी सांगितले. संगमनेर दुध संघाचे संघाचे संचालक भारत मुंगसे,
नाशिक मनपा स्थायी समितीचे सदस्य भागवतराव आरोटे, सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, विद्यमान अध्यक्ष ज्ञानेश्वर मुंगसे, नामदेव कहांडळ यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याने भरलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करीत समाधान व्यक्त केले.