अहमदनगर : गावातील अंगणवाडी वेळेवर उघडली नाही, म्हणून सरपंचाने अंगणवाडीच्या वरीष्ठ महिला पर्यवेक्षकाकडे तक्रार केली. याचा राग आल्याने त्या सारपंचास तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना जामखेड तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे, शंकर विष्णु भोंडवे व अनिल उर्फ महावीर शिवाजी कडु (सर्व रा.घोडेगाव ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, घोडेगाव येथील सरपंच शरद भास्कर भोंडवे यांनी दि.२९ नोव्हेंबर रोजी गावातील अंगणवाडी क्र.२३ ही सकाळी १० वाजता उघडली नव्हती. त्यामुळे सरपंच जगताप यांनी या अंगणवाडीची तक्रार बीट पर्यवेक्षिका आढाव यांच्याकडे अंगणवाडी वेळेवर उघडत नसल्याबाबत तक्रार केली होती.
घोडेगाव येथील या अंगणवाडीत जामखेड बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे यांची पत्नी त्रिशाला विष्णु भोंडवे या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तक्रार केल्यामुळे विष्णु भोंडवे यांनी सरपंचास ग्रामपंचायत कार्यालयात येऊन दम देखील दिला होता. दरम्यान दि.३ जानेवारी रोजी सरपंच हे गावातील जिल्हा परिषद शाळेतील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमास उपस्थित होते.
यानंतर त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मदतनीस महिला व अंगणवाडी सेविका आल्या व त्यांनी सरपंच शरद जगताप यांना सांगितले की, संपुर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप सुरू आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही ग्रामपंचायतच्या पाठिंब्याचे पत्र द्या असे बोलत होते.
या वेळी शंकर विष्णु भोंडवे, बाजार समितीचे संचालक, विष्णु शामराव भोंडवे हे त्या ठिकाणी आले व सरपंच शरद जगताप यांना मारहाण केली तर अनिल उर्फ महावीर शिवाजी कडु याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर जखमी झालेले सरपंच शरद भास्कर भोंडवे यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले .