MLA Sangram Jagtap : रस्ता विकासाची कामे मार्गे लागल्यानंतर दळणवळणाचा प्रश्नही मार्गी लागतो व शहर विकासाबरोबर व्यवसायिकरणालाही चालना मिळत असते. यासाठी उपनगर व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची कामे हाती घेतली आहेत.
बोल्हेगाव नागापूर हे उपनगर झपाट्याने विकसित होत असून या भागामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यासाठी येत आहे त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले आहे, बोल्हेगाव नागापूर परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा मार्ग म्हणून सावेडी गावाकडे जाणारा रस्ता महत्त्वाचा आहे. या मार्गावरील सीना नदीवरील अनेक वर्षापासून असलेल्या दगडी पुलाची आता अत्यंत दुरवस्था झाली आहे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे सावेडी बोल्हेगाव सीनानदी मार्गावरील पुलाच्या कामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
पावसाळ्यामध्ये नदीला येणाऱ्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. हा अरुंद व नादुरुस्त पुल झाल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी दुर्घटना घडल्या आहे. राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आर्थिक बजेट च्या पुरवणी यादीमध्ये सावेडी बोल्हेगाव सीनानदी वरील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे
याचबरोबर सावेडी बोल्हेगाव, निंबळक बायपास रस्ता डांबरीकरणाचे काम यापूर्वी झाले होते, आता मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत या रस्त्याच्या रुंदीकरणासहित डांबरीकरण कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या परिसराच्या विकासाला गती प्राप्त होईल व नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा मार्ग उपलब्ध होईल असे आ.जगताप म्हणाले.