Ahilyanagar News:- काल विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्र्यांचा शपथविधी पार पडला व अहिल्यानगर जिल्ह्याला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने एकच मंत्र पद मिळाले. तसे पाहायला गेले तर या वेळेस अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेलेले संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळेल अशी एक अपेक्षा होती.
इतकेच नाही तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत गेलेल्या भाजपाच्या मोनिका राजळे यांना मंत्रीपद मिळण्याची एक शक्यता होती. ती देखील फोल ठरली. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीच्या दृष्टिकोनातून बघितले तर तेव्हा तीन मंत्र्यांचा पॅटर्न होता व तो आता महायुतीने बदलला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर हा क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा तर आहेच.परंतु राजकीयदृष्ट्या देखील जिल्ह्याला महत्त्व आहे. परंतु तरीदेखील या जिल्ह्याला एकच कॅबिनेट मंत्री पद मिळाले. जेव्हा 2014 ते 19 या दरम्यान राज्यात भाजप शिवसेना यांची सत्ता होती त्यावेळेस देखील अहिल्यानगर जिल्ह्याला एकच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते.
परंतु 2019 नंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले व त्यांनी तीन कॅबिनेट मंत्री तर एक राज्यमंत्रीपद जिल्ह्याला दिले होते व त्या अगोदर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यकाळात देखील तीन कॅबिनेट मंत्रीपदे जिल्ह्याकडे होते. परंतु यावेळेस मात्र भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत व त्यामध्ये सर्वाधिक दहा जागा महायुतीच्या निवडून आल्या. यामध्ये भाजपला सर्वाधिक चार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार तर शिंदे गटाला दोन अशा दहा जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून हेमंत ओगले यांच्या रूपाने एक व कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पवार अशा दोन जागा मिळाल्या.
या अगोदर केव्हा मिळाली होती जिल्ह्याला तीन मंत्रीपदे?
जेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होते व सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली होती व त्यावेळी काँग्रेसचे गोविंदराव आदिक, राष्ट्रवादीचे मधुकर पिचड हे कॅबिनेट मंत्री होते तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे पाटबंधारे राज्यमंत्री होते.
त्यानंतरच्या कालावधीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील हे दोघेही कॅबिनेट मंत्री होते. तर राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते पालकमंत्री होते.
त्यानंतर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री पद व जलसंधारण खाते हे भाजपचे आमदार राम शिंदे यांना मिळाले होते व त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेना व भाजप एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. परंतु दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली व 2019 ते 2022 मध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारला.
त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद होते. त्यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव गडाख तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्री पद तर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राज्यमंत्रीपद होते.
मंत्रीपदावरून पेटणार दक्षिण-उत्तर असा वाद?
अहिल्यानगर जिल्हा जर बघितला तर हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा असून जिल्ह्याचा उत्तर भाग हा बागायती व सदन समजला जातो. परंतु त्या तुलनेत मात्र जिल्ह्याचा दक्षिण भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उत्तरेतून राधाकृष्ण विखे यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली.
परंतु दक्षिण अहिल्यानगर भागातून तीन आमदार भाजपचे निवडून आले आहेत व दक्षिणेतून मंत्रिपद मिळेल अशी एक अपेक्षा होती. परंतु ती काल फोल ठरली. त्यामुळे आता महायुतीमध्ये दक्षिण- उत्तर वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिसऱ्या टप्प्यात मिळू शकते राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद
जेव्हा मंत्रिमंडळाचा तिसरा टप्प्यातील विस्तार होईल तेव्हा जिल्ह्यातून राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद मिळेल अशी एक शक्यता आहे. जे काही मंत्रीपदासाठी इच्छुक होते अशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागा कमी आहेत व त्यामुळे पुढच्या टप्प्यात विचार करू अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मंत्री पदासाठी फिल्डिंग लावलेली होती. परंतु ऐनवेळी जागा कमी असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.