Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. परिसरात बिबट्याची संख्या वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक पुरते भयभीत झाले असून वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
एखाद्याचा जीव गेल्यावर वनविभाग पिंजरा लावणार का, असा संतप्त सवाल सोनेवाडीतील सुरेश साबळे, गणपत राऊत, दीपक घोंगडे आदींनी उपस्थित केला आहे. सोनेवाडी परिसरात
गेल्या काही दिवसांपासून या बिबट्यांनी गावातील शेळ्या, मेंढ्या, गायी, कोंबड्या, पाळीव कुत्री, डुकरे प्राण्यावर हल्ला करत जखमी करत त्यांचे प्राण घेतले आहे. शेतामध्ये जाताना शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच शकुंतला गुडघे, निरंजन गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे आदी यांनी या बिबट्याना जेरबंद त्यांना करण्यासाठी वेळोवेळी निवेदन दिले आहे.
मात्र निवेदन देऊनही वनविभागाचे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बिबट्याचा वनविभागाने जर वेळीच बंदोबस्त केला नाही. तर एखाद्याचे प्राण घेतल्याशिवाय हा बिबट्या माघार घेणार नाही,
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सोनेवाडी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आली आहे.