Ahmednagar News : सरकारने नेहमीच शेतकरी आणि गोरगरिबाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचे काम प्रामाणिकपणे हाती घेतलेले आहे.निश्चितपणे प्रत्येक लाभधारकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने अनेक प्रश्न सुटून विकासाला सुद्धा चालना मिळाली. त्यामुळे विकासकामे करत असताना वाईटपणा घेण्याची आपली तयारी असते कारण आपण विकासकामात मी कधीच तडजोड करत नाही. असे मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यात विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, वांबोरी चारीला पाणी सोडण्याची जबाबदारी आमची आहे परंतु वांबोरी चारीची पाईपलाईन फोडणारे देखील आपलेच आहेत. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी संघटित राहून पाईपलाईन कोणी फोडणार नाही याची दक्षता घ्यावी.
आगामी काळात लवकरच या भागात शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवून गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावले जातील असेही आश्वासन खा. विखे यांनी दिले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले म्हणाले की, काही काळ राज्यात आपलं सरकार नसल्याने विकासकामे खुंटली होती. त्यानंतर आता महायुतीचे सरकार आल्याने विकासकामाला चालना मिळाली आहे.
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे , खासदार विखे आणि आमच्या प्रयत्नातून वांबोरी चारीच्या वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. २५ लाख रुपये वीज बिलापोटी भरण्यात आले असून आता या योजनेच्या मोटरीही चालू झाल्या आहेत. योजनेतील प्रत्येक गावातील तलावात हे पाणी दिले जाईल अशी ग्वाही माजी आमदार कर्डीले यांनी दिली.