अहमदनगर बातम्या

‘ती’चे सेलिब्रेशनमध्ये महिलांनी लुटला नृत्याचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :-‘झिंग झिंग झिंगाट, श्री वल्ली….’ अशा एकास एक सरस गाण्यांची धून व डीजेचा तालावर नृत्याचा मनसोक्त आनंद घेणारी नारीशक्ती.. गाण्याच्या तालावरील विद्युत रोषणाई..

घरातील जबाबदाऱ्या व ताणतणाव विसरून सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणी व महिला अशा वातावरणात नगर-मनमाड रस्त्यावरील बंधन लॉन येथे रविवारी (दि. 13) रात्री ‘ति’चे सेलिब्रेशन रंगले होते.

यावेळी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांचा आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते नगर आयकॉन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

जागतिक महिला निमित्त भूमिका ग्रुपच्यावतीने आयोजित व सुरभि हॉस्पिटलच्यावतीने प्रायोजित ‘ति’चे सेलिब्रेशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे नाईट, पुरस्कार सोहळा, विविध फनी गेम्स आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे आ. राजळे म्हणाल्या की, फक्त 8 मार्च हा महिलांसाठीचा दिवस असू नये.

वर्षाच्या 365 दिवस महिलांचा सन्मान होण्याची गरज आहे. नारी शक्ति नेमके काय-काय करू शकते, हे जगाला दाखवून दिलेले आहे. आता समाजात फक्त महिलांना योग्य सन्मान देणे गरजेचे आहे. वर्षातील एक दिवस नव्हे, तर दररोज महिलांना सन्मान मिळाला पाहिजे.

यावेळी नगर आयकॉन पुरस्काराने वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. मर्सिया वॉरन, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेवती देशपांडे, शैक्षणिक सेवेबद्दल मिरा पाटील, नॅन्सी कौल, उद्योजिका अर्चना भंडारे, आर्किटेक्ट कविता जैन, बॉक्सिंग खेळाडू खुशी जाधव,डोनेट  फर्स्ट ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर सौ. रोहिणी शेंडगे, सुरभी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुलभा पवार, भूमिका ग्रुपचे सदस्य व सुरभि हॉस्पिटल येथील सर्व डॉक्टर व संचालक उपस्थित होते.

सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला आ. मोनिका राजळे व महापौर सौ. शेंडगे यांच्या हस्ते नगर आयकॉन पुरस्कार देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर डीजेच्या तालावर नारीशक्ती मनसोक्त नृत्याचा आनंद घेऊ लागली.

संगीताच्या तालावर फिरणारी विद्युत रोषणाई वातावरणात आणखी रंगत आणत होती. डीजेच्या तालावर डान्स सुरू असताना मायलेकी, जावाजावा अशा विविध कौटुंबिक नाते संबंधित महिलांसाठी स्पर्धा व रॅम्प वॉक आयोजित केले होते. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

जशीजशी रात्र वाढू लागली, तशी कार्यक्रमात आणखी रंगत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. सुलभा पवार यांनी इतरांची काळजी घेताना महिला स्वतःकडे लक्ष देत नाही.

म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सौ. मधुरा झावरे व सौ. धनश्री खोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुरभी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी यांनी मानले.

अडीच वर्षांनंतर हजारो महिला प्रथमच एकत्र

कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून अडीच वर्षांनंतर नगर शहरातील महिला रविवारी बंधन लॉन येथे तिचे सेलिब्रेशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आल्या. यावेळी सुमारे तीन हजार महिला उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts