अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ahmednagar News :- महापालिकेचे नगरसेवक अमोल येवले यांना तिघा अनोळखी व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून तिघे कोतकर यांच्या हॉटेल सागर नेते याठिकाणी आले. आरोपींनी चेहरे पुर्णपणे झाकलेले होते. त्यातील एका आरोपीने हॉटेलवरील कामगाराला, ‘कुठे आहे तो अमोल येवले’, असे विचारले.
तसेच त्यानंतर ‘तुम्ही इथून निघून जा, येथे अमोल येवलेचा मर्डर होणार आहे’, असे आरोपी म्हणाले. काही काळ आरोपींनी तेथे धिंगाणा घातला आणि नंतर हॉटेलसमोर असणार्या चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली.
यामध्ये ह्युंडाई क्रेटा (एमएच 16 बीएच 3903) आणि टाटा अल्ट्रोज (एमएच 16 सीव्ही 6333) यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.