Ahilyanagar News:- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणास असे अनेक दिग्गज नेत्यांचे उदाहरण घेता येईल की त्यांचा राजकारणाचा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्या पासून तर थेट विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारापर्यंत झाल्याचे दिसून येते. काही अपवाद सोडले तर बहुसंख्य नेत्यांचा प्रवास हा अशाच पद्धतीचा झाला आहे.
आधी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणाहून देखील बऱ्याच राजकीय व्यक्तींचा प्रवास हा अशाच पद्धतीचा दिसून येतो. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तीन जण आणि 2019 मध्ये एक जिल्हा परिषद सदस्य आमदार झाला होता.
अगदी अशीच परिस्थिती आता पारनेर विधानसभा मतदारसंघातून देखील आपल्याला दिसून येत आहे. यावेळेस देखील पारनेरमधून कोणीही एक जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभेत पोहोचणार आहे. आपल्याला माहित आहे की, जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते व जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर बऱ्याच जणांना विधानसभेचे वेध लागते.
राज्यामध्ये 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली व अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहे. यात बरेचजण काही आजी-माजी आमदार आहेत तर काही जिल्हा परिषद सदस्य नशीब आजमावत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जर बघितले तर बऱ्याच जिल्हा परिषद सदस्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळालेली आहे. 2014 मध्ये नगर जिल्ह्यातून तीन जिल्हा परिषद सदस्य आमदार झाले होते व त्यात श्रीगोंद्यातून राहुल जगताप, शेवगाव पाथर्डी मधून मोनिका राजळे तर अकोल्यातून वैभव पिचड यांचा समावेश होता.
2019 मध्ये अकोल्यातून डॉ. किरण लहामटे हे एकमेव जिल्हा परिषद सदस्य विधानसभेत निवडून गेले होते. यावेळेस मात्र सहा आजी माजी जिल्हा परिषद सदस्य विधानसभेच्या रिंगणात असून त्यात सर्वाधिक तिघेजण पारनेर मतदारसंघातून आहेत.
तसेच श्रीगोंदा व शेवगाव आणि नेवासातून प्रत्येकी एक जण निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे आता कोणता जिल्हापरिषद सदस्य निवडून येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.
पारनेरमध्ये जिल्हा परिषद सदस्यांमध्येच प्रमुख लढत
पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी राणी लंके तसेच काशिनाथ दाते व संदेश कार्ले या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत आहे व विशेष म्हणजे हे तिघेजण जिल्हा परिषद सदस्य आहेत. या तिघांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांपूर्वी संपलेला आहे व त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राणी लंके,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते तर अपक्ष म्हणून संदेश कार्ले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तिघांमधून कोणीही निवडून आले तरी एक जिल्हा परिषद सदस्य आमदार होणार मात्र निश्चित. तीच परिस्थिती श्रीगोंद्यातून देखील असून या ठिकाणी अनुराधा नागवडे उद्धव सेनेकडून रिंगणात असून त्या 2017 ते 2022 या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य होत्या.
तसेच नेवासा विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल लंघे हे शिंदे गटाकडून रिंगणात आहेत व त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा अनुभव आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून कोणता जिल्हा परिषद सदस्य निवडून येतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.