Electric Cars News : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडिया लिमिटेड (MSIL) खरखोडा, हरियाणा येथे मोठ्या गुंतवणुकीसह आपला नवीन उत्पादन कारखाना (Factory) स्थापन करण्यासाठी पावले उचलत आहे. हा प्लांट ९०० एकर परिसरात पसरलेला आहे.
हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांनी एका जाहीर सभेत सांगितले की, मारुती सुझुकी या दशकाच्या मध्यापर्यंत (२०२५) खरखोडा येथे आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे (electric vehicle) उत्पादन सुरू करेल.
सुझुकी या कारखान्यातील १०० एकर जागा मोटारसायकल बनवण्यासाठी वापरणार आहे, तर उर्वरित ८०० एकरवर मारुती इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार आहे.
हरियाणातील तरुणांना खासगी क्षेत्रातील रोजगार (Private sector employment for youth) आरक्षण कायद्यानुसार उपलब्ध नोकऱ्यांपैकी ७५ टक्के नोकऱ्या (Jobs) दिल्या जातील. या कारखान्यात सुमारे ११,००० तरुणांना रोजगार मिळेल, तर मोटरसायकल क्षेत्रात सुमारे ३,००० कामगार कामावर असतील.
नवीन कारखान्याचा पहिला टप्पा २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याची उत्पादन क्षमता प्रति वर्ष 2.5 लाख युनिट्स असेल. नवीन कारखान्याच्या उभारणीसंदर्भातील प्रशासकीय मान्यता घेणे बाकी आहे.
MSI ने सांगितले की ते प्लांटच्या पहिल्या टप्प्यावर 11,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहेत. भविष्यात सोनपत कारखान्यात क्षमता विस्तारासाठीही जागा उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे.
बॅटरी उत्पादनासाठी नवीन कारखाना सुरू करण्यासाठी 7,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिले इलेक्ट्रिक वाहन भारतीय आणि जागतिक बाजारपेठेसाठी मध्यम आकाराचे SUV असण्याची अपेक्षा आहे.