Electric Scooter:- सध्या पेट्रोल व डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे नागरिकांचा कल दिसून येत असून स्कूटर पासून तर दुचाकी आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे कार देखील आता ईव्ही स्वरूपामध्ये येत आहेत.
वाढत्या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून देखील या वाहनांचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे. भारतामध्ये अनेक नामवंत आणि प्रसिद्ध असलेल्या कंपन्या अशा इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत असून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता वाढताना दिसून येत आहे.
त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ देखील खूप वेगाने वाढताना आपल्याला दिसून येत आहे. जर आपण सध्या वापरात किंवा मार्केटमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार केला तर यामध्ये ओला व इथर या कंपन्यांच्या स्कूटर्स बाजारात असून त्यांना ग्राहकांकडून देखील चांगली पसंती मिळताना दिसून येत आहे.
परंतु आता या इलेक्ट्रिक स्कूटरच्या कंपन्यांना तगडी टक्कर देईल अशी एक भारतातील जुनी कंपनीने देखील इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये आणण्याचे तयारी केली असून बजाज ऑटोच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्यात येणार आहे.
बाजारात येणार आता बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य असलेल्या ओला व इथर या कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी आता बजाज ऑटोच्या माध्यमातून या वर्षाच्या सुरुवातीला बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याची प्लॅनिंग असून ही स्कूटर कंपनीच्या माध्यमातून नऊ जानेवारीला सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.
या स्कूटरमध्ये आता सिग्निफिकँट अपडेट पाहायला मिळणार आहेत. अर्बन आणि प्रीमियम अशा दोन व्हेरियंटमध्ये हे बदल दिसतील. बजाजच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.2kWh ही बॅटरी मिळणार असून सिंगल चार्जमध्ये ही 113 किलोमीटरची रेंज देईल असा देखील दावा करण्यात आला आहे. या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज करण्याकरिता चार तास तीस मिनिटांचा वेळ लागणार आहे.
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कोणते वैशिष्ट्य असतील?
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 73kmph चा टॉप स्पीड मिळेल व जुन्या मॉडेलच्या तुलनेमध्ये हा टॉप स्पीड जास्त असणार आहे. तसेच या स्कूटरमध्ये नवीन टीएफटी स्क्रीन मिळेल.
त्याशिवाय टर्न बाय टर्न नेवीगेशन, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अंडर सिटी 21 लिटरची स्टोरेज कॅपॅसिटी असणार आहे. चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मेटल बॉडी दिली असून बॉडीच्या बाबतीत ही स्कूटर उत्तम अशी असणार आहे.
किती राहिल या स्कूटरची किंमत?
बजाज ऑटोची 2024 बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत साधारणपणे एक लाख 15 हजार रुपये असणार आहे. याच्या फीचर लोडेड व्हेरिएंटची किंमत एक लाख एकवीस हजार रुपये असणार आहे. लवकरात लवकर या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू करण्यात येईल अशी देखील शक्यता आहे.