बाजारभाव

Onion Price : बफर साठ्यासाठी ५ लाख टन कांदा खरेदीचा विचार

Onion Price : सरकार या वर्षी आपल्या बफर साठ्यासाठी ५ लाख टन कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे. किमती वाढल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

नॅशनल को ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नाफेड यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून सरकार कांद्याची खरेदी करेल, असे सूत्रांनी सांगितले.

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी पाच लाख टनांचा बफर स्टॉक तयार केला होता. त्यापैकी एक लाख टन अद्याप उपलब्ध आहे. ‘बफर स्टॉक’मधून सवलतीच्या दरात कांद्याची विक्री करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत सरकार या महिन्याच्या अखेरीस निर्णय घेणार आहे. ही बंदी ३१ मार्चपर्यंत आहे. २०२३-२४ वर्षांमध्ये कांद्याच्या उत्पादनात घट होण्याच्या अंदाजानुसार बफर साठा तयार करण्याची सरकारची योजना आहे.

एकूण उत्पादन घटण्याचा अंदाज

२०२३-२४ वर्षांमध्ये कांद्याचे सुमारे २५४.७३ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ३०२.०८ लाख टन उत्पादन झाले होते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३१६.८७ लाख टन कांद्याचे उत्पादन झाले होते.

महाराष्ट्रात ३४.३१ लाख टन, कर्नाटकात ९.९५ लाख टन, आंध्र प्रदेशात ३.५४ लाख टन आणि राजस्थानमध्ये ३.१२ लाख टन उत्पादन घटल्याने एकूण उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी मंत्रालयाच्या निवेदनात व्यक्त केली आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar
Tags: Onion price

Recent Posts