Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे कापसाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात आज मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. खरेतर, कपाशी हे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र, या पिकाची लागवड गेल्या दोन वर्षांपासून तोट्याची ठरू लागली आहे.
या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याची वास्तविकता आहे. दरम्यान, विजयादशमीपासून सुरू झालेला कापसाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. अशातच आता कापसाच्या वायद्यांमध्ये कापसाच्या किमती सुधारत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
आज आंतरराष्ट्रीय वायदे बाजार आणि देशातील वायदे बाजारातही सुधारणा दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय वायदे बाजाराचा विचार केला असता आज वायद्यांनी पुन्हा एकदा ८२ सेंटच्या टप्पा पार केला आहे. दुसरीकडे देशातील वायदे देखील पुन्हा एकदा ५८ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर पोहचले आहेत.
पण, देशातील बाजार समित्यांमधील भावात आजही चढ उतार पाहायला मिळाले आहेत. मात्र, सरासरी भावपातळी मात्र कायम राहिली आहे. सरासरी दर ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान नमूद केले गेले आहेत.
दरम्यान कापूस बाजारातील तज्ञांनी जर आगामी काळातही आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा टिकून राहिली तर देशातही सुधारणा अपेक्षित असल्याचा अंदाज जारी केला आहे. अशातच आता आपण आज महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमध्ये कापसाला नेमका काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती : आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला किमान 6000, कमाल 7685 आणि सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज मीडियम स्टेपल कापसाला किमान 6600, कमाल 7,675 आणि सरासरी 7600 असा भाव मिळाला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लोकल कापसाला किमान 6500, कमाल 7550 आणि सरासरी सात हजार रुपये असा भाव मिळाला आहे.
वरोरा-खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6100, कमाल 7470 आणि सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटाल असा भाव मिळाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कापसाला किमान 6000, कमाल 7,300 आणि सरासरी सात हजार 100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.