Onion Market Price : महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांदा विक्रमी दरात विक्री होत होता. कांद्याचे आगार नासिक जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटनपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळू लागला होता.
महाराष्ट्रातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळाला होता. मात्र, आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. जाणकार लोकांच्या मते मध्यप्रदेश मधील कांदा अजूनही उत्तर भारतातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
यामुळे उत्तर भारतातील दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश बिहारी यांसारख्या प्रमुख राज्यात महाराष्ट्रातून विशेषता नासिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कांदा दरात घसरण होत असून येत्या काही दिवसात कांदा दर अजूनच घसरतील अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मधील कांदा अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वांदा करत असल्याचे चित्र आहे.
बुधवारी नासिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रतिक्विंटल ते 1600 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे दर मिळालेत. दरम्यान जाणकार लोकांनी आता कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले आहे. खरं पाहता जुना कांदा नोव्हेंबर मध्ये संपतो मात्र यावर्षी अजूनही जुना कांदा तीस टक्क्यांपर्यंत शिल्लक असल्याचे चित्र आहे.
यामुळे मागणीपेक्षा अधिक पुरवठा होत असल्याने कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे. विशेष म्हणजे जुना कांदा तीस टक्के आणि आता बाजारात नवीन लाल कांदा देखील मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. दरम्यान डिसेंबर मध्ये नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे अशा परिस्थितीत कांदा दरात अजूनच घटवण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
दरम्यान उत्तर भारतातील राज्यांमध्ये मध्य प्रदेशमधील कांद्याला अधिक मागणी असते कारण की मध्य प्रदेश मधील कांदा उत्तर भारतातील राज्यांना अधिक स्वस्तात मिळतो. शिवाय मध्य प्रदेश मध्ये कांद्याचे अधिक उत्पादन झाले असल्याने तूर्तास मध्य प्रदेश मधील कांदा टिकून आहे. श्रीरामपूर येथून उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतात कांद्याचे मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. मात्र आता श्रीरामपूर येथून उत्तर भारतात केवळ दहा टक्के कांदा जात आहे.
अशा परिस्थितीत केवळ दक्षिणेकडील राज्यांमध्येच महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा पाठवला जात आहे. केवळ दक्षिणेकडील राज्यांवर महाराष्ट्राचा मदार असल्याने शिवाय दक्षिणेकडील राज्यातही यावर्षी कांदा मुबलक असल्याने कांदा दराची कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान निर्यातीबाबत देखील फारसे सकारात्मक चित्र नाही. महाराष्ट्रातून कांदा निर्यात बांगलादेश आणि श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात केली जाते.
विशेषता नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील कांदा या दोन राष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. मात्र बांगलादेशमध्ये कांदा आयतीसाठी निर्बंध आहे तर श्रीलंका दिवाळखोरीत आहे, एकंदरीत काय येणारा काळ अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगला नसल्याचे चित्र आहे.