गेल्या वर्षभरापासून निसर्गात होणारे बदल, त्यामुळे कांदा पिकासह इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजाचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडून जात आहे.
मागील काही महिन्यात कांद्याची दरवाढ गगनाला भिडली होती, त्यातूनच शेतकऱ्यांना (Farmer) एक आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र आता चालू बाजारभाव हा पूर्णपणे ढासळला असून कांद्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आधीच राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. अशातच त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यावर दुहेर संकट येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे क्षेत्र असते.
मात्र, सध्या या कांद्याला दर मिळत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. उन्हाळी कांदा काढणीला सध्या वेग आला असला तरी या अपेक्षित उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकर्यांचा खर्च देखील निघणार नाही, असे चित्र दिसत आहे.
सुरुवातीच्या कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपयांचा जागेवर भाव मिळाला होता. मात्र, सध्या कांद्याला सातशे ते आठशे रुपये भाव मिळत आहे. परिसरात अजूनही बराच कांदा काढणीचा बाकी आहे.
एप्रिल (April) महिन्यात सर्व शेतकर्यांचा कांदा काढून होईल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्व कांदा काढून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्याने आवक वाढून मोठी घसरण होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे.
बाजार समितीत ( market committee) जरी कांद्याला १ हजार २०० ते १ हजार ३०० रुपयांचा दर मिळत असला तरी जागेवर कांद्याला ७०० ते ८०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यातच उत्पन्न घटल्याने खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे बळीराजा सांगत आहे.