Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, खेडा खरेदीमध्ये सोयाबीन दरात वाढ झाली आहे. खरं पाहता दिवाळीनंतर सोयाबीनचे आवक वाढले आहे.
मात्र असे असले तरी राज्यातील बहुतेक तेल कंपन्यांना सोयाबीनची उपलब्धता होत नसल्याचे चित्र आहे. परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची साठवणूक केली जात असल्याचा अंदाज बांधला जात आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांना आता सोयाबीन उपलब्ध करून घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांचा मळा गाठावा लागत आहे.
तेल कंपन्यांनी आता थेट शेतकऱ्यांपासून सोयाबीन विकत घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तेल कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनला अधिक दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी खेडा पद्धतीने तेल कंपन्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन विकत घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा मिळत आहे.
तेल कंपन्यांकडून अधिक दरात सोयाबीनची खरेदी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे साठवणूक केली जात असल्याचे सांगितले जात असल्याने येत्या काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रयोगशील शेतकरी नमूद करत आहेत. काही जाणकार लोकांच्या मते जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन दरात मोठी वाढ होणार असून सोयाबीन यापेक्षा दुपटीच्या किमतीत विकला जाणार आहे.
दरम्यान काही शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडा खरेदीत सोयाबीनला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली या ठिकाणी देखील सोयाबीन दरात वाढ झाली असून सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक दर तेथील शेतकऱ्यांना मिळत आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या सरासरी बाजारभावात विक्री होत असल्याचे चित्र आहे.
मात्र येथे काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे काही जाणकारांनी नमूद केले आहे. सध्या शेतकरी बांधवांनी देखील बाजार समिती ऐवजी खेडा खरेदी मध्ये सोयाबीन विक्रीस पसंती दर्शवली आहे. मात्र खेडा खरेदीमध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.