बाजारभाव

Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावात वाढ होणार? कसा राहणार सोयाबीन हंगाम, वाचा व्यापाऱ्यांच मत

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) मध्य प्रदेश राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर आपल्या महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक.

एकंदरीत काय राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर (Soybean Crop) अर्थकारण अवलंबून आहे. मात्र या वर्षीचा सोयाबीन हंगाम शेतकऱ्यांसाठी (Farmer) निराशाजनक ठरला आहे. या वर्षी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाचे उशिरा आगमन झाले.

परिणामी सोयाबीनचा पेरा बहुतांशी ठिकाणी उशीरा झाला. सोयाबीनची उशिरा पेरणी झाल्यामुळे अन पेरणी झाल्यानंतर अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट निर्माण झाले. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक पिवळे आपलं काही ठिकाणी वावरात सोयाबीन पीक कुजल.

अतिवृष्टीमधून वाचलेलं सोयाबीन पीक अधिकचा खर्च करून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्यांनी जोपासलं. मात्र ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाला दणका दिला. ऐन काढणीच्या वेळी सुरू असलेला संततधार पाऊस सोयाबीन पिकासाठी घातक ठरला असून अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. आता या मधून जे सोयाबीन पीक वाचलं आहे किंवा वाचणार आहे ते सोयाबीन पीक बाजारात विक्रीसाठी शेतकरी बांधव लगबग करणार आहेत.

आता पुढे दिवाळीसारखा सण येतोय अशा परिस्थितीत सणासाठी पैशांची जमवाजमव करणे हेतू शेतकरी बांधव सोयाबीन विक्री करणार आहे. मात्र सध्या सोयाबीनला बाजारात जो दर (Soybean Rate) मिळतोय त्यात झालेला उत्पादन खर्च निघणे देखील मुश्कील आहे. सोयाबीन पिकासाठी या हंगामात अधिक उत्पादन खर्च आला आहे. शिवाय या हंगामात सोयाबीनला गेल्या हंगामापेक्षा कमी बाजारभाव (Soybean Market Price) मिळत आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची दिवाळी यावर्षी आर्थिक आणीबाणी सारखी झाली आहे. यावर्षी हवामान बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकावर रोगांचे सावट अधिक होते अशा परिस्थितीत बियाणे, खतांपासून ते फवारणीसाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला आहे. यामुळे सोयाबीन पीक यावर्षी शेतकऱ्यांसाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला होता.

साधारण बाजार भाव देखील साडे सात हजाराच्या घरात होता. त्यामुळे यावर्षी सोयाबीनला तसाच बाजार भाव मिळेल या आशेने शेतकरी बांधवांनी सोयाबीनचा पेरा वाढवला. विपरीत परिस्थिती असताना देखील सोयाबीनची पेरणी करण्यात आली. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली आहे. शिवाय आता गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहेत.

यातच जे सोयाबीन पावसात भिजले आहे आणि त्याचा दर्जा खालावला आहे अशा सोयाबीनला तीन हजाराच्या आसपास बाजार भाव मिळतोय. दरम्यान सोयाबीन बाजार भावाबाबत व्यापाऱ्यांनी दिलेल्या अंदाजानुसार, यावर्षी 2024 पर्यंत खाद्यतेल आयातीला करमुक्त ठेवण्यात आले असल्याने सोयाबीन बाजार भावात वाढ होईल असं वाटत नाही. यामुळे यावर्षी सोयाबीन बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावणार असल्याचे चित्र बनले आहे.

दरम्यान काही जाणकारांच्या मते, या वर्षी सोयाबीनचा साठा मुबलक असल्याचं कारण पुढे करत सोयाबीनचे बाजार भाव पाडले जात आहेत. मात्र, सध्या सोयाबीन बाजारभावाबाबत भाष्य करणं चुकीचं ठरणार नाही.

येत्या काही दिवसात सोयाबीन उत्पादनाबाबत स्पष्टता येणार असून त्यावेळी सोयाबीन दराबाबत योग्य तो अंदाज जाणकारांना बांधता येणार आहे. एकंदरीत सोयाबीन बाजार भाव वाढला तरच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढून दोन पैसे शिल्लक राहणार आहेत. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts