Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. शेतकरी बांधव या पिकाला पिवळं सोनं म्हणतात. कापसाला पांढर सोनं आणि सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र गत दोन हंगामापासून पिवळं सोनं शेतकऱ्यांसाठी मातीमोल ठरत आहे. गत दोन हंगामापासून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शिवाय बाजारात अपेक्षित भावही मिळत नाहीये. या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे.
दुसरीकडे कृषी निविष्ठांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. महागाईमुळे मजुरीचे दरही वाढत आहेत. यामुळे पीक उत्पादनाचा खर्च आकाशाला गवसणी घालतोय अन बाजारात सोयाबीन कवडीमोल दरात विकावे लागत आहे. मात्र गेल्या दहा दिवसांच्या काळात सोयाबीन बाजारात उलटफेर झाला आहे.
सोयाबीनचे दर जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत. काही ठिकाणी क्विंटल मागे अडीचशे ते तीनशे रुपयांची भाव वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी कवडीमोल दरात विकल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या रेटमध्ये तीनशे रुपयांपर्यंतची भाव वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळू लागला आहे.
मात्र जेव्हा बाजारात नवीन माल दाखल होईल तेव्हा कशी परिस्थिती राहणार, बाजार भाव आणखी वाढणार का? असे काही प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. खरे तर केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे तेलबिया पिकांचे भाव विक्रमी वाढले आहेत. सोयाबीनचे भाव वाढण्यामागे देखील केंद्रातील सरकारच्या या निर्णयाचा मोठा रोल राहिला आहे. दहा दिवसांपूर्वी राज्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 3375 ते 4 हजार 400 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकले जात होते.
मात्र 14 सप्टेंबर 2024 ला झालेल्या लिलावात सोयाबीन 4000 ते 4600 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकले गेले. अर्थातच क्विंटल मागे दोनशे रुपयांची सरसकट वाढ पाहायला मिळाली. खामगाव प्रमाणेच राज्यातील इतर बाजारातही सोयाबीनचे दर वाढले आहेत. पण नव्या हंगामातील सोयाबीन विजयादशमी नंतर बाजारात येणार आहे.
अर्थातच येत्या पंधरा-वीस दिवसात नवीन सोयाबीन बाजारात चमकणार आहे. अशा परिस्थितीत जेव्हा नवीन सोयाबीन बाजारात येईल तेव्हा बाजार भाव कसे राहणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सोयाबीन हे राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे पीक आहे.
याची लागवड ही महाराष्ट्रात सर्वाधिक केली जाते. उत्पादनाचा विचार केला असता देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45 टक्के उत्पादन एकट्या मध्य प्रदेश राज्यात आणि 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते.
म्हणजेच या दोन शेजारी राज्यांमध्ये सोयाबीनचे 85 टक्के उत्पादन होते. यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरच येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना किमान आठ ते नऊ हजार रुपये दर मिळावा अशी आशा आहे. यामुळे आता जेव्हा बाजारात नवीन सोयाबीन दाखल होईल तेव्हा काय दर मिळतो हे पाहावे लागणार आहे.