Soybean Market Price : गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सोयाबीन हे एक प्रमुख नगदी पीक आहे. मात्र या पिकाची शेती आता शेतकऱ्यांना परवडत नाहीये. याचे कारण म्हणजे सोयाबीनची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दुसरे म्हणजे सोयाबीनला बाजारात फारसा भाव मिळत नाहीये.
गेल्या वर्षी तर अनेक शेतकऱ्यांना आपला सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकावा लागला आहे. अशा या परिस्थितीत गेल्यावर्षी उत्पादित झालेल्या सोयाबीनला अनुदान मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केली जात होती.
या मागणीसाठी स्वतः राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. यानुसार राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान जाहीर केले आहे.
या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 20 गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीत सोयाबीन किंवा कापसाची लागवड केली असेल त्यांना किमान एक हजार रुपये आणि ज्यांनी दोन हेक्टर जमिनीवर सोयाबीन किंवा कापसाची लागवड केली असेल त्यांना कमाल दहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
यासाठी राज्य सरकारने चार हजार दोनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. आता या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात या अनुदानाचा पैसा मिळणार आहे. अशातच, आता सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने सोयाबीन उत्पादकांना दिलासा देत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये हमीभावात सोयाबीनची खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार तीन महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच 90 दिवसांसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून सोयाबीनची किमान हमीभावात खरेदी करणार आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत.