Soybean Rate India : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. साहजिक या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला समाधानकारक दर मिळाला असल्याने या हंगामात देखील अधिक दराची अपेक्षा शेतकरी बाळगत आहेत.
पण गेल्या आठवड्यात बाजार भाव स्थिर राहिल्याने शेतकरी बांधव संभ्रमअवस्थेत सापडला आहे. एकीकडे जागतिक बाजारात दरात मोठी वाढ होत आहे मात्र देशांतर्गत सोयाबीन बाजार अजूनही स्थिर आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली दरवाढ देशांतर्गत सोयाबीन दरासाठी लाभदायक सिद्ध होणार नाही असं शेतकऱ्यांना वाटू लागलं.
मात्र आता जाणकार लोकांनी पुढील आठवड्यापासून या बदललेल्या परिस्थितीचा फायदा मिळू शकतो असे मत व्यक्त केले आहे.या आठवड्यात जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ झाली.सोमवारी 14.41 डॉलर प्रति बुशल्सने सौदे झालेत तर शनिवारी 14.81 डॉलर प्रति बुशल्सने.
बाजार अभ्यासकांच्या मते चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होत असल्याने त्या ठिकाणी सोयाबीनची मागणी वाढली आहे आणि प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.
परिणामी उद्योगांकडून आतापासूनच यासाठी तयारी सुरू झाली असून खरेदी वाढवण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दरात वाढ झाली आहे. याचा देशांतर्गत बाजारात अजून तरी फारसा फरक पडलेला नाही मात्र पुढील आठवड्यापासून भारतात सोयाबीन दरात वाढ होणार आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनला 5200 ते 5600 रुपये प्रति क्विंटल असा दर बाजारात मिळाला.
प्रक्रिया प्लांटमध्ये मात्र 5700 ते 5900 असा दर पाहायला मिळाला. खरं पाहता आतापर्यंत जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ झाली आहे. मात्र आगामी काळात प्रमुख खाद्यतेल म्हणजे सोयातेलाच्या दरात पण वाढ होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून सोयाबीन बाजारभाव वधारणार आहेत.