Soybean Rate : सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असल्याचे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बियाण्यासाठी उपयोगात आणले जाणारे सोयाबीन दर देखील कमी झाले आहेत.
मिलचा सोयाबीन तर त्याहून कमी किमतीत विकला जातोय. अशा बदलत्या स्थितीत शेतकऱ्यांपुढे सोयाबीन विक्री बाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बळीराजाच्या मनात सोयाबीन विकावा की साठवणूक करावी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
खरं पाहता, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावरील निर्बंध हटवले, म्हणजेच स्टॉक लिमिट काढून घेतले. त्याचा परिणाम म्हणून तेलबियाचे दर वाढतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. तेलबियाचे दर वाढले मात्र अपेक्षित अशी वाढ झाली नाही.
आता स्टॉक लिमिट काढल्यानंतर अवघ्या वीस दिवसात पुन्हा एकदा तेलबीया दरात विशेषता सोयाबीनच्या बाजारभावात घसरून होत आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनची विक्रमी आवक झाली, मात्र दर पडल्याने दुसऱ्या दिवशी आवक कमी झाली. मिल क्वालिटी सोयाबीन दर ₹6000 प्रतिक्विंटल वर पोहोचला होता, तर बिजवाईचे सोयाबीन साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दरात विक्री होत होता.
दरम्यान आता मिल क्वालिटी सोयाबीन 5 हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. बिजवाईच्या सोयाबीनला देखील मात्र साडेपाच हजार रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रात सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पादित झाला आहे.
विशेष म्हणजे भारतात अतिवृष्टी झाली तरी देखील सोयाबीन उत्पादनात वाढ पाहायला मिळत असल्याचा दावा झाला आहे. शिवाय कच्च्या खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात भारतात आयात झाली आहे. तसेच प्रमुख सोयाबीन ग्राहक चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले असून चीनमध्ये अजूनही पूर्ण क्षमतेने मार्केट ओपन झालेले नाही.
परिणामी सोयाबीनची चीनमध्ये पाहिजे तशी निर्यात सोयाबीन उत्पादक राष्ट्रांकडून होत नसल्याचे चित्र आहे. या एकंदरीत परिस्थितीचा विचार केला असता देशांतर्गत सोयाबीन दर दबावात आले आहेत.
जाणकार लोकांनी पुढील दोन महिने अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज सांगितला आहे. एकंदरीत दोन महिन्यानंतर सोयाबीन दर वाढतील की असेच राहतील याबाबत योग्य ते चित्र उभे राहू शकणार आहे.