Ahmadnagar breaking : उपकार्यकारी अभियंता यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवलेल्या रिपोर्ट नुसार जामखेड येथील सहाय्यक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच रागातून निलंबित केलेल्या सहाय्यक अभियंत्याने महावितरणच्या कार्यालयात तोडफोड करत टेबलच्या काचा फोडल्या.
या प्रकरणी कर्जतचे महावितरण उपव्यवस्थापक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक अभियंता प्रल्हाद सदाशिव टाक याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती आशी की, प्रल्हाद सदाशिव टाक (सहाय्यक अभियंता) यांच्या विरोधात त्यांचे प्रभारी अधिकारी शरद चेचर (उपकार्यकारी अभियंता) यांनी पाठवलेल्या रिपोर्टवरुन त्याच्यावर वरीष्ठ कार्यालयाने दि.२ जानेवारी २०२४ रोजी निलंबनाची कारवाई केली होती.
वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाईचे पत्र मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या प्रल्हाद टाक याने दि.५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दीड वाजता जामखेड महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या केबीनची अर्धांग रॉडच्या सहाय्याने तोडफोड करून टेबलच्या काचा फोडल्या.
तसेच कार्यालयातील शासकीय कर्मचारी व ग्राहक यांचेवर देखील हल्ला करुन साक्षीदार यांना जखमी केले. यावेळी उपअभियंता शरद चेचर हे उपस्थित नव्हते. परंतु काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते.
या प्रकरणी कर्जतचे महावितरण उपव्यवस्थापक अमोल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक अभियंता प्रल्हाद सदाशिव टाक याच्या विरुद्ध कार्यालयाची मोडतोड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने महावितरण विभागाच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले असून एकच खळबळ उडाली आहे.