Ahmadnagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या सुकेवाडी येथील युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शनिवारी सायंकाळी या युवकावर सुकेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील विजय रावसाहेब कुटे (वय ३७) याचा मृतदेह शुक्रवारी मालदाड येथील डोंगराजवळ आढळला होता.
त्याच्या मृतदेहाजवळ दारूची बाटली आढळली होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मयत विजय कुटे याच्या विरोधात एका युवतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर तो गायब झाला होता. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. शवविच्छेदनासही त्यांनी विरोध केला होता.
विजय याने विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पोपट सखाराम धुमाळ, सुरज भाऊसाहेब सातपुते, नाना गणपत कुटे यांच्यासह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.