Ahmednagar Breaking : संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून कृषीपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीची मोहीम राबवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही महावितरण कडून अशीच अनागोंदी वसुली वाजवली जात आहे. यामुळे जे शेतकरी बांधव नियमित आहेत त्यांचे देखील नुकसान होत आहे.
दरम्यान आता जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने महावितरणाच्या त्रासातून आत्महत्या केल्याच खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट जाधव या शेतकऱ्याने महावितरणाने शेतीपंपाची वीज कट केल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आला आहे.
यामुळे अकोळनेरच्या ग्रामस्थांमध्ये आणि नेत्यांमध्ये महावितरणाविरोधात संताप आहे. गावकऱ्यांनी जोपर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संबंधित शेतकऱ्याचा अंत्यविधी करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. यामुळे सध्या अकोळनेर गावात तणावाचे वातावरण असून संबंधित घटनेचा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून निषेध व्यक्त होत आहे.
खरं पाहता, सध्या राज्यात रब्बी हंगाम सुरू आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. जाधव यांनी देखील रब्बी पिकांची पेरणी केली होती. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देणे देखील आवश्यक. मात्र गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने जाधव यांची वीज कट केली.
परिणामी पिकांना पाणी कसं भरायचं हा मोठा प्रश्न जाधव यांच्या पुढ्यात उभा राहिला. आपल्या डोळ्या समोर पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने विवचनेतून पोपट जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. यासाठी महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप परिवाराकडून, नातेवाईकांकडून तसेच गावकऱ्यांकडून केला गेला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पोपट जाधव उच्चशिक्षित प्रयोगशील शेतकरी म्हणून अकोळनेर मध्ये ओळखले जातात. त्यांनी एमए बीएड पर्यंतचे शिक्षण घेतले होते. उच्चशिक्षित असून देखील नोकरीची त्यांनी शेतीला निवडलं. मात्र महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांचा जीव गेला असल्याच्या प्रतिक्रिया नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान आता जोपर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संबंधीत शेतकऱ्यांची अंत्यविधी होणार नसल्याचे गावकऱ्यांनी परिवाराने नमूद केले आहे. यामुळे आता यावर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.