अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात एक अर्ज केला होता. सुनावणीच्या वेळी आरोपी बाळ बोठेने स्वत: उपस्थित रहावे, असं या अर्जात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांच्या या अर्जावर आज (दि. १४) सुनावणी झाली.
या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्या समोर या अर्जावर सुनावणी झाली. रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईड बोठे याने नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर दि. ११ डिसेंबरला सुनावणी झाली होती. या सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाला त्यांचे म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. मात्र सुनावणीच्या वेळी आरोपी बाळ बोठे याने स्वत: उपस्थित रहावे, असा अर्ज पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आला होता. या अर्जावर आज (सोमवारी) सुनावणी झाली.
सुनावणी वेळी सरकारी पक्षाच्यावतीने सांगण्यात आले, की हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून आरोपीने स्वत: कोर्टात हजर राहणे आवश्यक आहे. आरोपीचे वकिल अॅड. तवले यांनी म्हटले, की पोलिसांनी आरोपी कोर्टात हजर रहाण्याचे ठोस कारण दिलेले नाही.
पोलिसांना आरोपीला अटक करायचे आहे, अटक करण्यासाठीच हजर राहण्यास सांगितले आहे. अशिलास अगोदर अटकेपासून संरक्षण द्यावे, तरच हजर करता येईल, असा युक्तीवाद केला. दरम्यान, कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र थोड्याच वेळात निकाल दिला जाणार असून या निकालाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.