Ahmednagar Breaking : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गावर श्रीरामपूर- ताहाराबाद चौकात मालट्रक व दुचाकीच्या अपघातात विवाहित तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश सुभाष पानसंबळ (वय ३४, रा. चिंचविहिरे) असे मृताचे नाव आहे.
राहुरी फॅक्टरी येथे रविवारी (दि. ७) रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास अहमदनगरकडून आलेला एमएच १७ बीवाय ७९४३ क्रमांकाचा मालट्रक चौकातून श्रीरामपूर रस्त्याकडे वळत होता. तेव्हा चिचविहिरे येथे घरी जाण्यासाठी ताहाराबाद रस्त्याकडे चाललेल्या एमएच १७ सीएच ५६६८ क्रमांकाच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली.
दुचाकीस्वार योगेश पानसंबळ रस्त्यावर पडून ट्रकच्या चाकाखाली सापडला व ट्रकने त्याला श्रीरामपूर रोडकडे जवळपास ३० ते ४० फुटापर्यंत ओढत नेले. यात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर तातडीने घटनास्थळी सामाजिक कार्यकत्यांनी मदतकार्य केले.
अपघातानंतर मालट्रकचा चालक गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. तर साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने जखमी तरुणास राहुरी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र प्राथमिक तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुरी येथे शवविच्छेदन करून काल सोमवारी (दि. ८) चिंचविहिरे येथे योगेश पानसंबळ यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ते गिरणी व्यावसायिक सुभाष पानसंबळ यांचा मुलगा तर ऑडिटर संजय पानसंबळ व शरद पानसंबळ यांचे चुलत बंधू होत. या घटनेमुळे चिंचविहिरे व राहरी फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.