अकोले पोलीस ठाण्याचा पदभार आता यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अकोल्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची अखेर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संगमनेरातून नियंत्रण कक्षात पोहोचलेले पेालीस निरीक्षक अभय परमार यांच्या हाती अकोल्याची सूत्रे सोपविण्यात आली आहे.

अकोले तालुका हा आदिवासीबहुल असल्याने येथे अवैध व्यवसायांसह गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. या सर्व घटकांवर पोलीस निरीक्षक परमार कशा पद्धतीने नियंत्रण मिळवितात व राज्याच्या राजकारणातील अकोल्यातील दिग्गजांना कशाप्रकारे हाताळतात यावरच अकोल्यातील त्यांची कारकीर्द अवलंबून राहणार आहे.

दरम्यान वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर काढणार्‍या कथित ऑडिओ क्लिपमुळे ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत होते. ‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळही उडाली होती.

त्याचा परिपाक पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अपेक्षेप्रमाणे अवघ्या दहाच दिवसांत त्यांची उचलबांगडी केली आहे. त्या सेाबतच त्यांच्या बदलीस कारणीभूत ठरलेला व अकोले पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार्‍या ‘त्या’ पोलीस शिपायालाही निलंबित करण्यात आले आहे.

अकोले तालुका क्षेत्रफळाने मोठा असल्याने अकोले व राजूर अशी दोन पोलीस ठाणी कार्यरत आहेत. परंतु, गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अक्षरशः लयास गेली होती.

आता धडाकेबाज पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी आपल्या कामगिरीची येथेही झलक दाखवून गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी अपेक्षा यानिमित्ताने अकोलेकरांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts