अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- महाविकास आघाडीतील मंत्री असलेले शंकरराव गडाख यांच्या मुळाएज्युकेशन मध्ये क्लार्क म्हणून नोकरीस असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे याने 29 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जनांवर गुन्हा दाखल असून यातील चार आरोपींनाअटक करण्यात आली आहे.
प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने व्हाट्सएप मेसेज, ऑडिओ-व्हिडीओ क्लिप मध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत.
त्यामुळे या प्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर ठिया आंदोलन केले.
त्यावेळी बोलताना माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर अनेक आरोप केले. मागील वर्षी गडाख कुटुंबातील एका महिलेने आत्महत्या केली होती. त्याचे पुढे काय झाले,
यावर पोलीस प्रशासनाने प्रकाश टाकावा आणि प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री असले म्हणून शंकरराव गडाख यांच्या दबावात न येता कार्यवाही करून चौकशी करावी अशी मागणीही मुरकुटे यांनी केली. यावेळी मोठा जनसमुदाय रास्तारोको आंदोलनात सहभागी झाला होता.
वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांना जलसंधारणमंत्री शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडून त्रास होत असल्याचा
निषेध करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. मंत्री गडाख यांच्या वर गुन्हे दाखल करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.