Big Breaking : कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून, यात कोणीही जखमी झालेले नाही.
आ. पवार यांचे पुण्यातील हडपसर येथे सृजन हाऊस हे कार्यालय आहे. दि. १३ जुलैच्या मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास २-३ अज्ञातांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन या कार्यालयावर हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून कार्यालयात खाली असलेल्या काही वस्तूंचे व उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात स्वतः आ. पवार यांनी तक्रार दाखल केली असून, अज्ञातांविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवळच असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीतील फुटीनंतर आ. रोहित पवार हे शरद पवार यांच्या बरोबर राहिले असून, त्यांनी सोशल मीडियातून वरिष्ठ नेत्यांना प्रश्न विचारत जोरदार आघाडी उघडली असून,
त्यास मिळणाऱ्या उत्तराला तेवढ्याच तत्परतेने उत्तरही दिले आहे. अगोदरच कर्जत-जामखेडचे आमदार म्हणून काम करताना राज्यातही ते विशेष प्रसिध्द असून, विविध विषयांवर आपले परखड मत ते मांडत असल्याने अल्पावधीत ते राज्यात प्रसिध्द झाले आहेत.
आपल्या वैविध्यपूर्ण कार्यशैलीने त्यांनी आपला ठसा उमटविला असून, सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाविरुद्ध त्यांनी जोरदार आघाडी उघडल्याने आ. पवार यांच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष लागलेले.
दरम्यान, काल रात्री हा हल्ला झाला त्यावेळी आ. पवार हे मुंबई येथे होते. अचानक त्यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात खळबळ उडाली असून, हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा त्वरित शोध घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.