अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते.
त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार त्यांच्यावर कोर्टात केस दाखल होती. परंतु आता कोर्टाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांचे कीर्तन लोकांना गर्भलिंग चिकित्सा किंवा तत्सम माहिती देण्यासाठी
आयोजित केलेले नव्हते. तर ते एक अध्यात्मिक प्रबोधनासाठी होते. त्यामुळे कथित विधान त्यामध्ये झाले असले तरी जाणीवपूर्वक कायदा मोडण्याचा हा प्रकार प्रथमदर्शनी तरी वाटत नाही,
असे निरीक्षण संगमनेरच्या सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. इंदोरीकर महाराजांविरूद्ध कनिष्ठ न्यायालयातील खटल्याला संगमनेरच्या सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी हा आदेश दिला आहे. त्यामध्ये हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. निरीक्षणे नोंदविणाताना म्हटले आहे की, ज्या बद्दल तक्रार आहे,
ते हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेले धार्मिक कीर्तन होते. यामध्ये लोकांना लिंग निदान किंवा तत्सम गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा हेतू दिसून येत नाही.
शिवाय अशा प्रकारच्या जाहिराती करून त्यातून पैसे कमाविण्यात येत असल्याचेही दिसून येत नाही. ज्या व्हिडिओंच्या आधारे तक्रार केली आहे, ते व्हिडिओही नंतर डिलीट झाल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अर्थ याचा प्रसिद्धी, प्रचार-प्रसारही होत नाही असा युक्तिवाद ऍड धुमाळ यांनी केला. त्यानुसार उपरोक्त निरीक्षण नोंदवत या खटल्याला स्थगिती देण्यात येत असल्याचे कोर्टाने आदेशात म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved