अटकपूर्व जामिनासाठी बोठेची धावपळ; ‘स्टँडिंग वॉरंट’ला दिले आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडात पसार असलेला मुख्य सूत्रधार संशयित आरोपी बाळ बोठे याने पोलिसांच्या स्टँडिंग वॉरंट अर्जाला आव्हान दिले आहे.

तसेच बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे. दरम्यान फरार बोठेला शोधण्यात अद्यापही पोलीस यंत्रलेणं यश आलेले नाही. पारनेर न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंटविरोधात बोठे याच्यावतीने अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी अर्ज दाखल केला.

त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराडे यांच्यासमोर मंगळवारी अ‍ॅड. ठाणगे यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. ठाणगे युक्तिवाद करताना म्हणाले, बोठे याचा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 31 डिसेंबरला अर्ज दाखल केला आहे.

रेखा जरे हत्याकांडातील तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी न्यायालयात स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज केला आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. तशी कायद्यात तरतूद आहे आणि अधिकार देखील आहेत. त्यानुसार बोठे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत.

खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय व्हायचा आहे. त्या अगोदर पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला. एकप्रकारे बोठेला पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे. बोठेला जामीन मिळू द्यायचा नाही, असेच यातून दिसते आहे.

बोठे अटक टाळत नसून, अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तो त्याला अधिकार आहे, असा युक्तिवाद करत अ‍ॅड. ठाणगे यांनी इतर खटल्यांतील दाखले न्यायालयासमोर सादर केले. स्टँडिग वॉरंटवर आज (बुधवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts