Ahmednagar breaking : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील एका तेरा वर्षांच्या विद्यार्थ्यांचा पतंगाच्या मागे धावताना दम लागून हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
सदर विद्यार्थी हा सोनेवाडीमधील जिल्हा परिषदेच्या सातवीच्या वर्गातील विद्यार्थी असून साहिल भाऊसाहेब गांगुर्डे असे त्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या सातवीच्या वर्गातील साहिल भाऊसाहेब गांगुर्डे हा घराशेजारीच पतंग उडवणाऱ्या मुलांचा पतंग कट झाल्याने तो पकडण्याच्या धावला.
तुटलेला पतंग त्याने पकडला, मात्र खूप जोरात धावल्याने साहिलला दम लागला. वडील भाऊसाहेब गांगुर्डे, आई सोनाली गांगुर्डे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्याला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याला कोपरगाव येथे दाखल करण्यास सांगितले. त्यांनी अवघ्या सात मिनिटात गावातील सागर जावळे यांनी आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये घालून त्याला दवाखान्यात पोहोचवले.
मात्र अतिशय जोरात धावल्याने त्याचा श्वासोश्वास बंद झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, साहिलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या घटनेने त्याच्या शिक्षक आणि मित्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे.