Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील वेगवेगळ्या गावात सुरू केलेल्या निधी संस्थेच्या (बँक) माध्यमातून नागरिकांना भरघोस व्याजाचे आमिष दाखवत शेकडो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा
गंडा घालत तालुक्यासह जिल्ह्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील सुरू असलेल्या शाखा एका दिवसात बंद करून संस्था चालकाने पोबारा केल्याची माहिती चर्चेतून समोर येत आहे.
एकाच वेळी सर्व शाखा बंद केल्याची चर्चा झाल्याने ठेवीदारांची एकच धांदल उडाली असून, काही ठेवीदारांकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
या बाबत चर्चेतून समजलेल्या माहिती नुसार अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात आपले आर्थिक ‘ध्येय’ साध्य करण्यासाठी सुमारे २० ते २२ शाखांचा विस्तार करणाऱ्या एका नामांकित मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने (निधी) श्रीगोंदा तालुक्यातील वेगवेगळ्या शाखांमधून जनतेचा विश्वास बसण्यासाठी शाखेत मॅनेजर ते शिपाई पदापर्यंत स्थानिक कर्मचारी भरत,
ठेवीदारांना भरघोस व्याजाचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करत जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील आपल्या सर्व शाखा एकाच वेळी बंद करत ठेवीदारांना गंडा घातल्याची चर्चा झाल्याने ठेवीदारांची एकच धांदल उडाली. शाखा बंद झाल्याची माहिती समजताच ठेवीदारानी त्या क्रेडिट सोसायटीच्या बाहेर आपल्या ठेवी घेण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांकडे धाव घेतली.मात्र पैसे नसल्याचे कारण देत संबंधित शाखेच्या मॅनेजरने शाखा बंद केली असल्याचे कारण सांगितले.
या आगोदर देखील तालुक्यातील एका मोठ्या नेत्याच्या गावातील ठेवीदारांना सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांचा गंडा घालत सुरू असलेली शाखा बंद केल्याचे प्रकरण घडल्याच्या घटनेला काही महिने पूर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा दुसऱ्या निधी संस्थेने ठेवीदारांच्या ठेवीवर डल्ला मारत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा समोर येत आहे.
अवाजवी व्याजाचे आमिष दाखवत ठेवीदारांकडून ठेवी गोळा करत ठेवींचे योग्य नियोजन न करता आर्थिक शिस्त नसल्याने अनाठायी खर्च तसेच कॅपेसीटी नसताना शाखा विस्तार करणे, या कारणांमुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे आर्थिक क्षेत्रातील सजग नागरिक असलेल्या राजेंद्र नलगे यांनी सांगितले.