विवाहित तरुणीची आत्महत्या

राहाता : तालुक्यातील साकुरी येथे एका विवाहितेने छपराच्या बांबुला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील कविता विजय गायकवाड (वय १८) ही विवाहित महिला साकुरी येथील १३ चारीजवळ बनरोड येथे माहेरी आली होती. काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास ती तीच्या मामाच्या छपरात गेली.

तेथे छपराच्या बांबुला ओढणी बांधली व गळफास घेतला. तीचा आठ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. दि. २७ ऑगस्ट रोजी परतमुळासाठी माहेरी आली होती. काल ती सासरी जाणार होती. तिला सासरी पाठविण्याची तयारी घरात सुरू होती. त्याचवेळी तीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात शैलेश रतन सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विवाह झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसातच कविता हिने आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मंडलिक हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Rahata

Recent Posts