Ahmednagar breaking : राहुरी येथील डॉ. तनपुरे कारखाना सिक्युरीटायझेशन कायद्यांतर्गत जिल्हा बँकेने ताब्यात घेणे बेकायदेशीर असून त्वरीत निवडणूका घेऊन कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा निर्णय होणे गरजेचे आहे.
याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कायदेशिर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी दिली.
या संदर्भात राहुरी येथे कारखाना बचाव कृती समिती समवेत काल बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. काळे हे कारखान्याबाबत चालू असलेल्या कायदेशिर लढाई व इतर कामकाजाची माहिती देताना बोलत होते.
यावेळी अरूण कडू, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. रावसाहेब करपे, रावसाहेब करपे, कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, राजूभाऊ शेटे आदींनी प्रास्तविकातून कायदेशिर व इतर लढाई बाबत माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, शेतकरी, कारखाना, कामगार व यावर अंवलबून असलेले सर्व घटक जगले पाहिजे, या शुध्द हेतूने राजकिय कोणताही हेतू न ठेवता आपण ही लढाई लढत आहोत. कारखाना अवसायनात गेल्यास तालुक्याच्या विकासात, अर्थकारणात महत्वाची भुमिका असणाऱ्या संलग्न संस्था धोक्यात येतील.
यासाठी निवडणूक होऊन प्रामाणिक माणसे व्यवस्थापनात आली तर, संस्था ही वाचतील व कारखाना वाचेल. २०१४ ला बँकेने सिक्युरीटायझेशन कायद्यानुसार कारवाई केली. त्यावेळी असलेल्या संचालक मंडळाने डीआरटी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यास त्वरीत स्थगिती दिली गेली.
परंतू, शासनाने कलम ७८ अंतर्गत कारवाई करून तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली. तत्कालीन प्रशासकाने २०१६ साली डीआरटी न्यायालयाची याचिका काढून घेतली हीच मोठी बेकायदेशीर गोष्ट असून त्यानंतर बँकेने कारखाना ताब्यात घेतला.
कारखान्याची निवडणूक होऊन त्यानंतर आलेल्या संचालक मंडळाकडून वैयक्तिक व सामुहिक हमीपत्र स्टँप पेपरवर घेऊन बँकेने कर्जाचे पुर्नगठन केले होते.
त्यानुसार बँकेने संचालक मंडळाला याबाबत जबाबदारी निश्चितीची नोटीस ही काढली. परंतू राजकीय दबावाने पुन्हा ही जबाबदारी कारखान्यावरच असल्याची नोटीस बँकेने काढली. २५ वर्षाच्या भाडेतत्वावर देण्याच्या कराराला प्रतिसाद दिसत नाही.
त्यातून वेळकाढूपणा करून राजकीय परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा येथे येऊन बसण्याचा काहींचा मनुसुबा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी अॅड. पंढरीनाथ पवार, बाळासाहेब गाडे, सुखदेव मुसमाडे, विजय कातोरे, भगवान गडाख, मधूकर तारडे, कारभारी ढोकणे, अशोक ढोकणे, बाळासाहेब आढाव आदींसह कारखाना बचाव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते