Ahmednagar Breaking : सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. दीपक गौतम पवार (वय 35 वर्षे, रा. टाकळीअंबड, ता.पैठण), नितीन मिसऱ्या चव्हाण (वय 20 वर्षे, रा.जोडमालेगांव, ता. गेवराई),
गोविंद गौतम पवार (वय 20 वर्षे,रा.टाकळीअंबड, ता.पैठण), किशोर दस्तगीर पवार (वय 19 वर्षे, रा.हिरडपुरी, ता.पैठण), राजेश दिलीप भोसले (वय 30 वर्षे, रा.टाकळी अंबड, ता.पैठण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल,
रोख रक्कम,शेळ्या, मोटारसायकल असा एकूण 2 लाख 49 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी : 21 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर (वय 23 वर्षे, रा. चापडगांव शिवार, चापडगांव, ता.शेवगाव) हे त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये झोपले होते. रात्री 1 च्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवत 1 लाख 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लांबवला. त्यानंतर 24 डिसेंबर 2023 रोजी अभय राधाकिसन पायघन (वय 24 वर्षे, रा.आखेगाव, ता.शेवगाव) यांच्या घरात रात्री 1 च्या सुमारास चोर घुसले.
घरातील महिला मंगल पायघन व रामकिसन काटे यांना मारहाण करत मुद्देमाल लांबवला. वरील घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना विशेष पथक नेमून गुन्हेगरांचा शोध घेण्यास सांगितले.
आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे आदींसह पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन विशेष पथके तयार करून कारवाईस सुरवात केली.
आहेर यांना गुप्तबातमीद्वारे हा गुन्हा दीपक गौतम पवार व इतर साथीदारांनी केल्याचे समजले व ते टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ही पथके तेथे रवाना झाली.
पोलिसांनी घराजवळ सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर उसाच्या शेतात पळून गेले. पोलिसांनी तत्परतेने वरील आरोपींना ताब्यात घेतले. यातील आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.