अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मागील काळात पंचायत समितीमध्ये दरोडे टाकण्याचेच काम झाले, असा सनसनाटी आरोप माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केला. केळी ओतूर येथे पंचायत समितीचे नूतन सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे व उपसभापती दत्तात्रय देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, सीताराम देशमुख, सखाराम सारोक्ते, पंचायत समिती सदस्य सीताबाई गोंदके, माधवी जगधने, सारिका कडाळे, ऊर्मिला राऊत, नंदा कचरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सुरेश लोखंडे, सोनाली नाईकवाडी, सी. बी. भांगरे, कैलास शेळके, रमेश शेंगाळ, रामनाथ भांगरे, भरत देशमाने, राजेंद्र देशमुख, गणेश पोखरकर, सोमदास पवार, बाळासाहेब सावंत, लक्ष्मण कोरडे आदी उपस्थित होते.
आता समाजासाठी काम करण्याचा सल्ला नूतन सभापती, उपसभापती यांना देऊन पिचड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचे व्हिजन सुरू केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2022 पर्यंत तालुक्यातील सर्व व्यक्तींना घरकुले, पिण्याचे पाणी, वीज, गॅस देण्याचे काम केले जावे, असा सल्ला दिला.
विधानसभा निवडणुकीत चाळीस वर्षांत काय केले, असा अपप्रचार करून जनतेला भूलविण्याचे काम झाले. 1972 च्या दुष्काळात पाझर तलाव, रस्ते करण्याचे काम केले. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी देण्याचे काम केले. 556 आश्रमशाळा बांधल्या. आदिवासी समाजाचे वेगळे बजेट निर्माण केले. 2000 साली पेसाचा कायदा केला. कोळी महादेव व महादेव कोळी एकच असल्याचे सुप्रीम कोर्टात सिद्ध केले म्हणून सर्व समाज वाचवला.
मी 40 वर्ष काय केले, म्हणणाऱ्यांनी रस्त्यावरचे फक्त खड्डे बुजवून दाखवा, असे आव्हानच पिचड यांनी केले. माजी आ. वैभवराव पिचड यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या पुढाऱ्यांनी आज तालुक्यात सुरू असलेले विकासकामांची मंजुरी कधीची आहे, याची माहिती घ्यावी. तालुक्यात अनेक विकासकामांचे वाण वाटले. परंतु त्याची आठवण जनतेला आली नसल्याची खंत व्यक्त केली.