Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात नेमके चालले काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हत्या, दरोडे आदी प्रकारांनी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. देहऱ्याची अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता एक कर्जतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केला. त्यानंतर या युवकाने स्वतःवरही चाकूने हल्ला करून घेतला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात मात्र चांगलेच भीतीचे वातावरण तयार झाले होते.
प्रतीक लक्ष्मण काळे (वय-२२, रा. राक्षसवाडी बुद्रुक, ता. कर्जत) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर श्रावणी मोहन पाटोळे (१८, म्हसेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत्यू युवतीचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
समजलेल्या माहितीनुसार : राक्षसवाडी बुद्रुक हे श्रावणीचे आजोळ आहे. श्रावणी सध्या येथे राहत होती. ती कर्जत येथे बारावीमध्ये शिक्षण घेत होती. आरोपी प्रतीक काळे याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवेत तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीला आली.
प्रतीक काळे याने तिला अडवले व प्रेमाबाबत विचारणा केली. विनाकारण मला त्रास देऊ नको, अन्यथा मी मामाला तुझे नाव सांगेल, असे श्रावणी म्हणताच प्रतीक यास राग आला. त्याने सोबत आणलेला धारदार चाकूने श्रावणीच्या पोटामध्ये वार केला. हा वार एवढा जोरात होता की चाकू श्रावणीच्या पोटातून आरपार गेला आणि ती तिथेच खाली कोसळली.
तिचा आवाज ऐकून शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्यानंतर आसपासचे लोक धावत आले. प्रतीक काळे याने जमलेले लोक पाहताच चाकूने स्वतःच्या पोटावरही वार करून घेतले. दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला होता. जखमी झालेल्या प्रतिक यास नगर येथे उपचारासाठी देण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.