Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा, आल्हणवाडी येथील सुरज पांढरे व पायल पांढरे, या बहीणभावाच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शनिवारी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.
चौकशी करुन घटनेला प्रथमदर्शनी जबाबदार असणारे प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब मस्के व वसतिगृह अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले यांना (ता.२८ ) रोजी तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सूरज संदीप पांढरे (वय ८) इयत्ता २ री व पायल संदीप पांढरे (वय ९) इयत्ता ३ री यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना शुक्रवारी घडली होती.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शनिवारी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. भेटीदरम्यान प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. एका विद्यार्थ्याने सुरज व पायलला शेततळ्याकडे जाताना पाहिले होते.
त्याने त्यांना पाठीमागे बोलावून जाऊ नका, अशी विनवणी केली होती. त्याची माहिती तेथील लोकांना दिली होती. तरीही ही घटना घडली आहे. असे चौकशीत समोर आले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबर या घटनेच्या अनुषंगाने चर्चा केली. घटनेच्या हलगर्जीपणाबाबत प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब मस्के व वसतिगृह अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले, त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.
त्याबाबचे आदेश सहाय्यक आयुक्त देवढे यांनी शनिवारी दिले आहेत. शासानाच्या प्रवेशित विद्यार्थ्याकडे संस्थेने दुर्लक्ष केले. शासकीय नियमांचे उल्लंघन केले, त्यामुळे संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.
मी दोन मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याच्या पार्श्वभूमीवर आल्हणवाडी प्राथमिक आश्रमशाळेला शनिवारी भेट देऊन विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा केली. चौकशीतून अनेक गोष्टी दुर्लक्षीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे मुख्याध्यापक व वस्तीगृह अधीक्षक हेच घटनेला कारणीभूत असल्याचे समितीच्या अहवालावरून स्पष्ट होते आहे. म्हणून त्यांचे निलंबन केले आहे. संस्थेने शासकीय नियमांचे पालन केले नाही. म्हणुन संस्थेचा परवाना रद्द करण्याची शिफारसीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. –राधाकिसन देवढे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग