कोरोनाच्या विरोधात ‘जनता कर्फ्यू’ जिल्हावासियांनी दिला उदंड प्रतिसाद

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला अहमदनगर जिल्हावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अर्थात, ही लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संपेपर्यंत अनावश्यक घराबाहेर पडू नका. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

आजच्या जनता कर्फ्युला केवळ नगर शहरातच नाही तर सर्व तालुक्यांची ठिकाणे, नगरपालिका, नगरपंचायत, मोठ्या लोकसंख्येची शहरे येथे प्रतिसाद मिळाला. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका ओळखून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. अगदी सकाळपासूनच गजबजलेल्या बाजारपेठा, बसस्थानके, महत्वाचे चौक अक्षरशा रिकामे होते. सर्व रस्ता निर्मनुष्य असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना बाधित दोन रुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या विषाणू संसर्गाची तीव्रता नागरिकांच्या लक्षात येत आहे. आजच्या दिवशी हे तीव्रतेने दिसून आले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनही स्वता रस्त्यावर उतरले. स्वत: जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरात फेरफटका मारुन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत वारंवार उपविभागीय अधिकारी आणि संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून माहिती घेण्यात येत होती.

नगर शहरातील महत्वाचे चौक, बाजारपेठा आज अक्षरश: ओस पडल्याचे चित्र होते. कापड बाजार, चितळे रोड, पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौक, दिल्ली गेट असे गर्दीने गजबजलेली ठिकाणी आज शुकशुकाट होता. कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकजण जणू वचनबद्ध असल्याची ग्वाही या कृतीतून नगरकरांनी दाखवून दिली. शहरातील माळीवाडा, तारकपूर आणि स्वस्तिक बसस्थानकांवर प्रवाशांची अजिबातच ये-जा नव्हती. बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. संपूर्ण रस्त्यावर ये-जा दिसत होती ती अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी यांची.

नगर शहराबरोबरच संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, शिर्डी, लोणी, राहाता, पाथर्डी, शेवगाव, कर्जत-जामखेड, कोपरगाव, श्रीगोंदा, पारनेर, अकोले, नेवासा अशा ठिकाणीही नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्याचे दिसून आले. याशिवाय, मोठी लोकसंख्या असणार्‍या गावातील नागरिकांनीही या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद दिला. ही लढाई प्रत्येकाच्या आरोग्यासाठी असल्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवला. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अशाच प्रकारे सर्वांनी कृतिशील वागण्याची गरज असल्याचे यातून स्पष्ट झाले.

दरम्यान, सध्याचे दोन आठवडे आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे हा धोका वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. जेथे जेथे वर्क फ्रॉम होम असे करणे शक्य आहे, त्यांनी या पद्धतीने कामकाज करावे. संपर्क टाळावा. तसेच परदेशातून परत आलेल्या व्यक्तींनी स्वताहून त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करुन घ्यावी. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वताला त्रास जाणवत असल्यास तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts