अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-रेखा जरे हत्या प्रकरणाचा खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम किंवा ऍड.उमेश यादव यांची नियुक्ती करावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक काेर्टात चालवावा, अशी मागणी रुणाल भाऊसाहेब जरे व फिर्यादीचे वकील ऍड. सचिन पटेकर यांनी जिल्हा पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे, जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बाेठे याच्याविराेधात सुपे पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
ताे आता फरार झाला आहे. त्याचा ठावठिकाणा अद्याप पाेलिसांना लागलेला नाही. त्यामुळे चाैकशी रेंगाळली असून संशयाला वाव मिळत आहे. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजत असताना दीड महिना हाेऊनही बाेठे पाेलिसांना सापडत नाही.
ब्लॅकमेलिंग हाच बोठेचा प्रमुख व्यवसाय आहे. त्याचा माेबाइल पाेलिसांनी जप्त केला असून त्यामधील काॅल डिटेल मुख्य पुरावा ठरणार आहेत.
या खटल्याची लवकर सुनावणी होऊन न्याय मिळावा, यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. निकम किंवा ऍड. यादव यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
त्याचबराेबर हा खटला फास्ट ट्रॅक काेर्टात चालवावा, अशी मागणी रुणाल जरे व फिर्यादीचे वकील पटेकर यांनी पाेलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे केली.
आरोपी बोठे आपल्या वकिलांच्या संपर्कात नियमित असताना पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा कसा सापडत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.