राहाता :- तालुक्यातील शिंगवे गावात वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा खून केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रज्जाक बशीर शेख (वय ६०) हे गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पुतण्या मोहसीन यासीन शेख तेथे आला.
वडिलोपार्जित शेतीच्या वादातून त्याने चुलत्यावर तीक्ष्ण हत्याराने पाठीत व डाव्या हाताच्या मनगटावर वार केले. नंतर तो तेथून पळून गेला.
रज्जाक शेख हे घटनास्थळीच मरण पावले. काही वेळाने शेजारचे शेतकरी हे तिकडे गेले असता रज्जाक गव्हाच्या शेतात पडलेले दिसले.
त्यांनी ही माहिती त्यांच्या घरच्यांना देत पोलिसांना कळवले. राहात्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी पथकासह जाऊन पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा केला.
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीचा माग काढण्यासाठी श्वानपथक बोलवण्यात आले. मात्र, श्वान तेथेच घुटमळले.
गेल्या दोन दिवसांपासून मोहसीन चुलत्याच्या मागावर होता.सकाळी गावात त्याने काहीजणांकडे माझा चुलता दिसला का, याची चौकशी केली. घटना घडल्यानंतर त्याला पळून जाताना काही नागरिकांनी पाहिले.
मृत रज्जाक शेख अतिशय शांत स्वभावाचे व मेहनती होते. घरची शेती करून इतर कामेही ते करत. त्यांना तीन मुले असून दोन मुले दिव्यांग आहेत.