अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शहरातील खड्डे व नादुरुस्त रस्त्यावरून शहरातील राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आहे. लोकप्रतिनिधी यांच्यासह महापौरांनी या सस्म्या सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे.
दरम्यान येत्या काळात नगरकरांना खड्डे व खडमडीत रस्त्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी अशा व्यक्त केली जाऊ शकते. शहरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.
त्यात शहरातील ओढ्या-नाल्यांवर इमारती उभ्या राहिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून धावले.रस्त्यांवरील डांबर पाण्याबरोबर वाहून गेले. ड्रेनेज नादुरुस्त झाले.
पावसाने विश्रांती घेताच महापालिकेने ड्रेनेज व रस्तादुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला आहे. नुकतीच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेत बांधकाम विभागाची बैठक घेऊन रस्तेदुरुस्ती व ड्रेनेज दुरुस्त करण्याचा आदेश दिला.
ड्रेनेजच्या कामासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने 50 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या कामास आठवड्यापूर्वीच सुरवात झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगला आजपासून सुरवात झाली.
त्यासाठी सुमारे दोन कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे.तशी मागणी महापालिकेच्या बांधकाम विभागाने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली आहे.
महापालिकेकडे खासगी दूरसंचार कंपन्यांच्या केबल खोदकामाला परवानगी दिल्याचे 82 लाख रुपये होते. त्यातील 64 लाख रुपये स्थायी समितीच्या परवानगीने मंजूर करण्यात आले.उर्वरित निधी अर्थसंकल्पातून घेण्यात येणार आहे.
शहरातून जाणारे राज्य महामार्ग खराब झाल्याची तक्रार आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.
तसेच, या रस्तेदुरुस्तीसाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना “अल्टिमेटम’ दिला होता. पावसाने विश्रांती घेताच सार्वजनिक बांधकाम विभागानेही महामार्गांवर पॅचिंग करण्यास सुरवात केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved