Ahmednagar Politics Breaking : श्रीरामपूर लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू झाला आहे. पण अनेक ठिकाणी मानपमान नाट्य रंगत आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी संयुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात शिर्डीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी नाराज झाले.
त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आगामी विधानसभा समोर ठेऊन ‘आमचं लग्न असलं तरी तुमचीही सुपारी आहे, विसरू नका’ अशी इशारावजा कोपरखळी मारली. राष्ट्रवादीकडूनही मानसन्मान मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यंदाच्या निवडणुकीत तीन-चार पक्ष आणि त्यांचे वेगवेगळे गट यांची सांगड घालून प्रचार करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. बैठका किंवा सभा म्हटली की, हे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकमेकांसमोर येतात. त्यातून अंतर्गत हेवेदावे अन् मानपमान नाट्य रंगत आहे. असाच काहीसा प्रकार या बैठकीत समोर आला.
उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे बैठकीला उशिरा आले. त्यावरून उपस्थित नेत्यांमध्ये थोडी नाराजी दिसून आली. त्यावर बोलताना खेवरे यांनी शरद पवार गटाच्या नेते, पदाधिकाऱ्यांना ठणकावले, नंतर सारवासारव करत आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण मिळून नियोजन करून विरोधकांना घाम फोड़, असेही शेवटी ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे लकी सेठी यांनीही आपल्या मनोगतात आमचे कार्यकर्ते जरी संख्येने कमी असले तरी आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मानाने वागवले गेले पाहिजे, अशी भूमिका मांडली. शिवसेनेचे संजय छल्लारे यांनी “कुणाचे लग्न अन कुणाची सुपारी” या वादात कृपया कार्यकत्यांनी पडू नये. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमीच उभा राहिला आहे. आ. कानडे यांनीच पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी शेवटी बोलून दाखवले,
वाकचौरे म्हणाले, उणीदुणी काढू नका, विरोधकांना संधी देऊ नका…
दोन्ही गटाचे पदाधिकारी एकमेकांना कोपरखळ्या मारत असताना भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतभेद वाढून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, माझे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील प्रत्येक पक्षात मित्र आहेत.
इथे कोण किती ‘पाण्यात’ आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे. आपल्यातील मतभेद वाढवून समोरच्या उमेदवाराला संधी देऊ नका, ही ती वेळ नाही. आपल्यातील मतभेद, हेवेदावे वाढवून विरोधकांना आयती संधी देवू नका. एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही वेळ नसल्याचे ते म्हणाले.