अहमदनगर :- जे काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे, असे म्हणत जे उडाले ते कावळे, असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी विखे यांना लगावला.
जे सोडून गेले त्यांच्यामुळे नवीन लोकांचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुषार गार्डन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी शिर्डीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सत्यजित तांबे, राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, आघाडीचा धर्म पाळून पक्षाचे सर्व कार्यकर्ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार करतील.
मतदारसंघात कोण कुणाचा प्रचार करत आहे, याची माहिती पक्षश्रेष्ठींना असून त्यावर योग्य तो निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाणार असल्याचा इशारा थोरात यांनी दिला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे, असे म्हणायचे अन् प्रचार भाजपचा करायचा, अशी भूमिका असेल, तर जिल्ह्याध्यक्ष का बदलायचे नाहीत?
पक्षाला जिल्ह्याध्यक्ष बदलू वाटले म्हणून जुने बदलून त्यांच्या जागेवर ससाणे यांची नियुक्ती केली आहे. तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.