नेवासे: माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज दाखल केले. आधी सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्याचे वाळवंट केल्याचा आरोप शंकररावांनी या वेळी केला.
पक्षाच्या झेंड्याखाली काम करताना मर्यादा पडत असल्याने अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे सांगत मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली. जिल्ह्यातील मातब्बर पुढारी सत्तेसाठी भाजप-सेनेत जात असताना तालुका व जनतेच्या हितासाठी अपक्ष उमेदवारी करत असल्याचे गडाख यांनी सांगितले.
मूळ प्रश्नांना बगल देऊन गडाख कुटुंबावर अश्लाघ्य भाषेत टीका करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे घाणेरडे राजकारण मुरकुटेंनी केल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचारात मुरकुटेंसोबत कार्यकर्ते कमी आणि वाळूतस्कर, ठेकेदार जास्त दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंतराव गडाख म्हणाले, गडाखांनी ३०-४० वर्षांत काय केलं? गडाख ही तालुक्याला लागलेली कीड आहे, असा बेछूट आरोप करताना ऊस पेमेंटच्या माध्यमातून २५०० कोटी, ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या माध्यमातून ७०० कोटी दिल्याचे मुरकुटे कसे विसरतात?
मुळा कारखान्याच्या माध्यमातून आठ हजार लोकांना गाळप हंगामात रोजगार उपलब्ध होतो, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ५५ हजार मुले-मुली प्राथमिक ते उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडले, हा विकास नाही का? सभामंडप विकासाचा मुद्दा होऊ शकत नसल्याचे गडाख यांनी सांगितले.
आपण एकही सभामंडप बांधून दिला नसल्याचे स्पष्ट करून गावात शाळेची इमारत बांधण्यासाठी मात्र वेळोवेळी सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. अर्ज भरण्यापूर्वी गडाख समर्थकांनी नेवाशात मिरवणूक काढली.